बावनकुळे यांनी विष प्यायल्यानंतर त्यांच्यावर उपचार करायचे की नाही हे आम्ही ठरवू- राजू शेट्टी

पुणे , २९ जानेवारी, (हिं.स.) : धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी बोलताना खासदार राजू शेट्टीनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी शेट्टींनी केली आहे. बावनकुळे यांनी विष प्यावे, त्यांच्यावर उपचार करायाचा की नाही हे आम्ही ठरवू, असे वक्तव्य राजू शेट्टींनी केले.

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या जमिनीचे पुनर्मूल्यांकन करण्यात येईल आणि पाटील कुटुंबावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले. यामुळे येवढे होऊनही अजून आश्वासन देत असल्याने शेट्टींनी बावनकुळेंना धारेवर धरले.मुख्यमंत्र्यांना धर्मा पाटील भेटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची दखल घेतली नाही.

या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. तसेच शेतकरी संघटना पाटील कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.राज्यात जमीन अधिग्रहणात दलालांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. दलाल आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असते. संबंधितांवर कारवाई करायला हवी, असेही शेट्टी म्हणाले. पाटलांच्या मृत्यूसाठी जमीन अधिग्रहण घोटाळा जबाबदार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.