‘ऊसाला पहिली उचल म्हणून ३३०० द्या, अन्यथा हंगाम बंद पाडू’, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

‘ऊसाला पहिली उचल म्हणून ३३०० द्या, अन्यथा हंगाम बंद पाडू’, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद आज मंगळवारी जयसिंगपूर येथे पार पडली. या ऊस परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारवर स्वाभिमानीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शेट्टींनी टीकास्त्र डागलं.

यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३०० रुपये प्रति टन द्यावेत, पहिल्या टप्यात विनाकपात एकरकमी एफआरपी अदा करावी उर्वरित रक्कम जानेवारी पर्यंत न दिल्यास सुरू हंगाम बंद पाडू असा इशारा शेट्टी यांनी दिला. जानेवारीत साखर दराची परिस्थिती पाहून आम्ही अंतिम दर मागू असेही ते म्हणाले. गतवर्षीच्या उसाला १५० रुपये दिवाळी पूर्वी द्यावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कोल्हापूरला मोर्चा काढला, ५ दिवस उन्हातान्हात चालत आलो. दोन पोरांनी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पाय सुजलेल्या अवस्थेत मुख्यमंत्र्यांच्या दारात गेलो. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली, तरी यांना पाझर फुटत नसेल तर आपण काय करायला पाहिजे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ‘पवार यांनी कारखानदाराला साथ दिली हे अनपेक्षित होते. शेतकऱ्यांनी साथ सोडली तर त्यांना अडचणीचे होईल. मराठवाडा विदर्भामध्ये पण उपेक्षा झाली. सरकार कडे पैसे नव्हते तर सरकारी नोकराना महागाई भत्ता कसा दिला याचे उत्तर हवे, दिवाळीला मंत्री येतील त्यांच्या हातात काळे झेंडे घेऊन स्वागत करा. त्यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका. पूरग्रस्तांसाठी अनेक आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली तरी त्यांच्यावर फरक पडला नाही. झालेले नुकसान न भरून निघणारे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या