fbpx

मंत्रिपदाची भीक सरकारकडे मागितली नाही- राजू शेट्टी

raju-shetty

सांगली : राजकारणात स्वार्थ साधण्यासाठी आपण कधीही मंत्रिपद मागितले नाही. आपण राजकीय भिकारीही नाही. केवळ शेतकर्‍यांच्या हितासाठी आपण सातत्याने स्वाभिमानी भूमिका बजावितो, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी आसूड ओढले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी झाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांतून सदाभाऊ खोत यांचा राजीनामा घ्यावा, असा दबाव निर्माण झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारात राजू शेट्टी यांनाही संधी मिळू शकते, असे वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने राजू शेट्टी हे बोलत होते. लोकसभा- विधानसभा निवडणुकीआधी भाजपबरोबर आघाडी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधान परिषदेची एक जागा व एक मंत्रिपद देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसारच विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोत यांच्या नावाची शिफारस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. मात्र सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर वर्णी लावताना भाजपच्या नेत्यांनी त्यांची वर्णी भाजपच्या चिन्हावर करून स्वाभिमानीशी गद्दारी केली, असा थेट आरोप राजू शेट्टी यांनी करून भाजपच्या चिन्हावर विजयी झालेल्या सदाभाऊ खोत आता स्वाभिमानीच्या विरोधात डरकाळी फोडत आहे. मात्र संघटनेने पाठपुरावा केला नसता, तर तुम्हाला भाजपने ना विधान परिषदेवर ना मंत्रिपदावर ठेवले असते का? हे प्रथम जाणून घ्यावे. आपल्या राजकीय वाटचालीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची नजर आहे. मंत्रिपद शाबूत रहावे, यासाठी शेतकर्‍यांचा तरी विश्‍वासघात करू नका. तुमच्याकडे थोडा जरी सन्मान असेल, तर संघटनेच्या जोरावर मिळविलेल्या व कोठेही जाऊन मंत्रिपद मिळवा. आमचा त्याला काहीच आक्षेप नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेली काही दिवस सदाभाऊ खोत हे आपल्याला सल्ला देत आहेत. यावर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले, की मी शेतकर्‍यांचा नेता असल्यामुळे शेतकरी सांगतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. त्यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची वा शिफारशीची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. सदाभाऊ खोत यांच्यावर जहरी टीका करताना राजू शेट्टी म्हणाले, की सदाभाऊ खोत किती स्वच्छ कारभार करतात, याचा अनुभव राज्यातील जनतेने घेतलेला आहे. शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या पारदर्शी कारभाराची चांगली कल्पना आहे. शेतक-यांशी गद्दारी करणे आपल्या रक्तात नाही. तरीही सदाभाऊ खोत म्हणत असतील, तर आपल्या भानगडींची सीआयडी चौकशी करून मला तुरूंगात टाका, असे आव्हानही त्यांनी दिले. आपल्या प्रतिमेबाबत सर्वसामान्यांना परिपूर्ण कल्पना आहे. तरीही तुम्हाला माझ्या भानगडी पाहिजे असल्या, तर सदाभाऊ खोत यांनाच विचारा किंवा तुम्हीही शोधून काढा. आपल्या काही स्त्रीलंपट भानगडी असतील, तर त्याही छापून टाका, असा अप्रत्यक्ष टोलाही सदाभाऊ खोत यांना राजू शेट्टी यांनी लगावला. आपले सारे आयुष्य आपण शेतकर्‍यांसाठीच खर्च केले आहे व उर्वरित आयुष्यही त्यांच्यासाठीच असेल. माझ्यावर टीका करणा-या लोकांना आपली भूमिका पटत नसेल, तर स्पष्टपणे सांगावे. भानगडी काढण्याची भाषा काहीजण करीत असले तरी माझे जीवन कोरे पुस्तक आहे, असे आवाहनही त्यांनी सदाभाऊ खोत यांना केले.