RSS ने धारावी कोरोना मुक्त केली असेल, तर जिथं त्यांचं मुख्यालय आहे तिथं कोरोनाचा कहर कसा?- राजू शेट्टी

raju shetti

कोल्हापूर: धारावीतील कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यात सुरु झालेला श्रेयवाद हा काही संपत नसल्याचं चित्र सद्या दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले होते. मात्र, भाजपा नेते चंद्रकांत पाटील, नितेश राणे यांच्यासह अनेक जणांनी याचे श्रेय RSS च्या स्वयंसेवकांना जाते असे स्पष्ट केले होते.

यानंतर शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले होते. आता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, “धारावीत कोरोनाचा हाहाकार माजला होता, कोरोनामुळे किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असं एकही वृत्त वाचनात , पाहण्यात आलं नाही. मात्र WHO ने जेव्हा सांगितलं धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले.”

‘फडणवीसांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालावी, म्हणजे सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम दिसेल’

यानंतर त्यांनी भाजपा व RSS ला प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, माझ्या मनात एक छोटीशी शंका आहे, RSS चं हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार आहे, तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही, कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे, अनेक शहरात आहे. त्यामुळे संघस्वेयंसेवकांनी तिथे जावं, त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्तीचं काम करावं, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल.” त्यामुळे आता यावर भाजपा काय प्रत्युत्तर देणार हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट जरी संपत नसले तरी यावरचे राजकारण मात्र चांगलेच तापणार आहे.

दरम्यान, भाजपा नेते नितेश राणे यांनी हे राज्य सरकारचं श्रेय नसल्याचं मत व्यक्त केले होते. त्यांनी ट्विट केले होते की,”राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत दिवसरात्र काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणं हे त्या संस्थांवर अन्याय करण्यासारखं आहे.”, असे नितेश राणेंनी म्हटले होते. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचं म्हटलं होतं.

#corona: चिंता वाढली; भारतात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद