केंद्र सरकार शेतकरी विरोधी मात्र महाविकास आघाडीनेही शेतकऱ्यांचे नुकसानच केले, राजू शेट्टींचा आरोप!

raju shetty

औरंगाबाद : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले तर आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांचे नुकसान केले. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आघाडी सरकार सत्तेवर आले. मात्र शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न त्यांनी मार्गी लावले नाहीत. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व इतर विविध मागण्यासाठी स्वाभिानी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आपेगाव येथे आज जागर व ऊस परिषदोचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

आपेगाव येथे ऊस परिषद,आक्रोश जागर सभा आयोजित करण्यात आली होती. उसाची एक रकमी एफआरपी कायदा बदल न करता पूर्वी प्रमाणे शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत पैसे देऊन उसाचा दर जाहीर करण्यात यावा, अतिवृष्टीची मदत तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांचे एक लाख रुपये प्रमाणे जमा करण्यात यावे, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा पंचनामे न करता सरसकट व तात्काळ आर्थिक मदत जाहिर करण्यात यावी, २०२०-२१ मधील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावा. आदी मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारने सोयाबीनचे कच्चे तेल आयात केले आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव कोसळले आहे. सोयाबीनचे भाव पाडणाऱ्या धन दांडग्या व्यापाऱ्यावर धाड न टाकता त्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी तुपकर, जिल्हा अध्यक्ष माऊली मुळे, राज्य उपाध्यक्ष सतीश बोराळकर, पूजा मोरे स्वाभिमानी युवा संघटना प्रदेश अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या