अखेर राजू शेट्टी सत्ता सोडणार ; अधिकृत घोषणा उद्या

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अखेर सत्तेला लाथ मारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ३० ऑगस्ट ला पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीनंतर ते सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करणार आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. एकंदरीतच खासदार राजू शेट्टी सत्तेत सहभागी असूनही कमालीचे नाराज होते.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही.

आता उद्याच्या बैठकीनंतर राजू शेट्टी सरकार मधून बाहेर पडल्यानंतर पुढील वाटचालीबद्दल काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागले.