महाआघाडीचा तिढा सुटला, स्वभिमानीसाठी २ जागा

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडत असल्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या वेगवेगळ्या पक्षांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यात हा निर्णय झाला आहे. आता ४८  पैकी काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागा  लढणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून मित्रपक्षांना दोन-दोन जागा सोडणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात २६ -२२ असा फॉर्म्युला ठरला होता. परंतु सहयोगी मित्रपक्षांना दोन्ही पक्षांना आपापल्या कोट्यातून चार जागा सोडल्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी आघाडीकडून प्रयत्न करण्यात आले होते. परंतु भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी जागावाटपावरुन एकमत न झाल्याने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सध्या हातकणंगले मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादीतर्फे स्वाभिमानीला सोडण्यात आली आहे. तसेच सांगली,अकोला किंवा वर्ध्याची जागा कॉंग्रेसकडून देण्यात येणार आहे . पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला मिळणार आहे. तसेच अमरावतीची जागा ही नवनीत कौर राणा यांच्यासाठी सोडली जाणार आहे. या जागावाटपामुळे महाआघाडीला मजबुती मिळण्याची शक्यता आहे.