सोलापूर जिल्हा बँकेतून गैरमार्गाने कर्ज घेतले त्या सर्वांना तुरुंगात टाका : शेट्टी

पुणे – जिल्ह्यातील बडे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेल्या सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप तसेच थकबाकीची वसुली न करणे आदींसह इतर अनेक कारणांमुळं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांनी ज्यांनी सोलापूर जिल्हा बँकेतून गैरमार्गाने कर्ज घेतले त्या सर्वांना तुरुंगात टाका अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी हि मागणी केली.

गेली अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. काही दिवसांपूर्वी बड्या नेत्यांच्या कारखान्यांना देण्यात आलेले कर्ज वसूल करण्यात बँकेला अपयश आल्याच उघड झाले होते , तसेच बँकेच्या संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केल्याने नाबार्डने देखील नाराजी व्यक्त करत कारभार सुधारण्यास सांगितले होते मात्र कोणताच फरक पडत नसल्याने अखेर प्रशासकाची नियुक्ती या बँकेवर करण्यात आली. हे सगळे होत असताना स्वाभिमानी गप्प का असा सवाल शेट्टी यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारण्यात आला यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली.

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी ?

ज्यांनी ज्यांनी सोलापूर जिल्हा बँकेतून गैरमार्गाने कर्ज घेतले त्या सर्वांना तुरुंगात टाका .गैरमार्गाने कर्ज घेणाऱ्या नेत्यांना तुरुंगात टाका ही आमची 10 वर्षांपासूनची मागणी आहे. स्वाभिमानीचा जरी कोणी कार्यकर्ता यात असेल तर त्याला ही अटक करा.काँग्रेस राष्ट्रवादी चे पुढारी यात जास्त आहेत म्हणून आम्ही शांत आहोत असं नाही.आम्ही तिकडेही याविरोधात आवाज उठवत आहोत.

या बँकेचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, माजी मंत्री आमदार दिलीप सोपल, सिद्धाराम म्हेत्रे, बबनराव शिंदे आदी दिग्गज नेते संचालक असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे. मागील काही वर्षांपूर्वी बँकेच्या तत्कालीन सभापतींसह संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केले. तसेच बँकेच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. जिल्ह्यातील नेत्यांचे कारखाने व संस्थांकडे सुमारे ६५० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए वाढला. नाबार्डने वारंवार सूचना देऊनही या थकीत कर्जाची वसुली करण्यात आली नाही. अखेर रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनंतर शासनाने सहकार खात्याच्या कलम ११० अ अन्वये संचालक मंडळ बरखास्त केले.

जिल्हा बँकेतून हजारो कोटींचा मलिदा लाटणारे प्रमुख कर्जदार

१) विजय शुगर्स, करकंब . –हा साखर कारखाना आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांच्या परिवाराचा.कर्ज आहे सुमारे १४० कोटी रुपये.

२) आर्यन शुगर्स, बार्शी . – राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपलांच्या पुतण्याचा हा कारखाना आहे. कर्ज आहे सुमारे १५७ कोटी रुपये.

३) सिध्दनाथ शुगर्स, ति-हे. – हा कारखाना खुद्द बँकेचे चेअरमन आमदार दिलीप माने यांचा . त्यांनी १८१ कोटी रुपयांचं कर्ज उचलंलय.

४) सांगोला सहकारी साखर कारखाना- या कारखान्याचे चेअरमन आहेत आमदार दिपक
साळुंके-पाटील कर्ज उचललंय. ३७ कोटी रुपये

५) अदित्यराज गुळ उद्योग— पाणी पुरवठा मंत्री मंत्री दिलीप सोपल यांचे समर्थक अरुण कापसे यांचा कारखाना आहे. त्यांनी कर्ज उचललंय सुमारे ३२ कोटी रुपये.नुकताच अरुण कापसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

६) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना—माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा कारखाना आहे. कर्ज उचललंय सुमारे २९३ कोटी रुपये.

७) विठ्ठल कार्पोरेशन,म्हैसगाव—हा कारखाना आहे बँकेचे माजी चेअरमन आणि आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे याचा. त्यांनी सुमारे ११९ कोटी रुपयेचं कर्ज घेतलं आहे.

८) शंकर सहकारी साखर कारखाना,शंकर नगर—काँग्रेसचे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहीते-पाटलांचा हा कारखाना आहे.त्यांनी सुमारे ९९ कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय.

९) सहकारमहर्षी शंकरराव मोहीते-पाटील सहकारी साखर कारखाना – मोहीते-पाटील यांचा कारखाना . सुमारे ३४५ कोटी रुपये कर्ज देण्यात आलंय.

१०) लोकनेते बाबुराव पाटील अॅग्रो इंडस्ट्रीज, अहमदनगर. —हा कारखाना आहे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा. त्यांनी सुमारे १५८ कोटी रुपयांचं कर्ज उचलंलय.

याशिवाय शैक्षणिक संस्थांना कर्ज देण्यासाठी खास नियमांत बदल करुन तरतूद कर्जाची तरतूद करण्यात आलीय.

११) एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या पांडूरंग प्रतिष्ठानला २९ कोटी देण्यात आले आहेत.

१२) मोहीते-पाटलांच्या शिवरत्न शिक्षण संस्थेला ७ कोटी .

१३) चेअरमन दिलीप माने यांच्या ब्रम्हदेवदादा माने शिक्षण संस्थेला ९ कोटी.