भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर राजू शेट्टींना काँग्रेस-राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही ?

raju shetti

मुंबई: राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या खा . राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता शिवसेना किंवा काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी यांच्यापैकी एकाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे . एकंदरीत स्थिती पाहता खा . शेट्टी यांना काँग्रेस – राष्ट्रवादीचाच पर्याय स्वीकारावा लागेल असे दिसते. मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळल्याचे कारण देत खा . शेट्टी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा अलीकडेच केली . शेट्टी यांच्या घोषणेवर भारतीय जनता पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत .

खा. शेट्टी यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाचे धोरण एकूणच सबुरीचे असल्याचे दिसते आहे. रामदास आठवले यांना ज्या प्रमाणे मंत्रीपद दिले गेले त्या प्रमाणे शेट्टी यांना केंद्रात मंत्रीपद हवे होते . ते मिळाले नाही. राज्यात मंत्री झालेल्या सदाभाऊंचा दबदबा वाढू लागला. त्यात भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रातही चांगलेच पाय रोवल्याचे दिसले. सत्ताधारी आघाडीत गेल्याने पूर्वीचे आक्रमक , लढवय्ये शेट्टी मवाळ झाले अशी टीका कोल्हापूर , सांगली , सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी सुरु केली होती. त्यामुळे शेट्टींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची पुढची वाटचाल अत्यंत अवघड असल्याचे त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सदाभाऊ खोतांसारखी मुलुख मैदानी तोफ आता शेट्टींच्या मदतीला नाहीये . हातकणंगले लोकसभा मतदार संघात शेट्टींना काँग्रेस – राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांशिवाय भाजपशी लढता येणार नाही अशी स्थिती आहे. विनय कोरे, महादेवराव महाडिक या सारख्या स्थानिक नेत्यांची फळी भाजपच्या मागे आहे. या फळीचा सामना करताना शेट्टींना शिवसेने ऐवजी काँग्रेस राष्ट्रवादी चा आश्रय घ्यावा लागेल , असे सांगितले जात आहे. शेट्टींचे एकेकाळचे जिवलग सहकारी आ. उल्हास पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेट्टींनी उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेत प्रवेश केला. तेही शेट्टींचा वचपा काढण्याची वाट पहात आहेत. शिवाय दक्षिण महाराष्ट्रातील साखर सम्राटही शेट्टींना कसे लोळवता येईल याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा स्थितीत शेट्टी हे काँग्रेस – राष्ट्रवादी च्या नेत्यांशी जुळवून घेतील असा अंदाज त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांकडून वर्तवला जातो आहे