छत्रपती शिवाजी महाराज भाजपची खासगी मालमत्ता नाही- राजू शेट्टी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त महाराष्ट्र व देशाची शान व अस्मिता आहे, भाजपची खासगी मालमत्ता नाही, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

“छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त महाराष्ट्राची, देशाची शान व् अस्मिता आहे. राज्याच्या जनतेच्या पैशातून शिवस्मारक उभारले जात आहे, याचा सर्वांना अभिमान आहे. मात्र, भाजपकडून असा आव आणला जात आहे, जणू ते एकटेच करते-सवरते आहेत.”, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर केली.

भाजपवर कठोर शब्दात टीका करताना राजू शेट्टी यांनी जेम्स लेन प्रकरणाचा दाखला देत सवालही केला आहे की, “आता अचानक महाराजांच्या नावाचा वापर करणारे ‘जेम्स लेन’ प्रकरणाच्या वेळी कोणत्या बिळात दडून बसले होते?”

खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यमान राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. सदाभाऊ खोत हे राज्यमंत्रीही आहेत.