मच्छीमार समाजाच्या राजेश आक्रे यांनी समाजापुढे ठेवला आगळावेगळा आदर्श

lokbiradari

पालघर : लग्न समारंभातील हळदीच्या कार्यक्रमाला बगल देत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नात मिळालेला तब्बल ५ लाखाचा आहेर बाबा आमटेच्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला देऊन चिंचणी दांडेपाडा येथील मच्छीमार समाजाच्या राजेश आक्रे यांच्या कुटुंबीयांनी समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श घालून दिला. यातील महत्वाची बाब म्हणजे लग्नपत्रिकेत केलेल्या आवाहनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जास्तीत जास्त रोख रक्कम स्वरूपातील आहेर म्हणून दिला होता.

डहाणू तालुक्यातील चिंचणी-दांडेपाडा येथील रहिवासी असलेले राजेश सदानंद आक्रे आपली पत्नी राधा, कन्या पुरातन वास्तू शास्त्रज्ञ असलेली उर्वी आणि डॉक्टर असलेल्या तन्वी सोबत बोरिवली येथे वास्तव्यास आहेत.मोठी मुलगी उर्वी हिचा लग्न समारंभ मरीन इंजिनिअर असलेल्या मुलाशी आयोजित केला होता. परमेश्वरानी आपल्याला चांगली आर्थिक सुबत्ता दिल्याने आपण आपल्या मुलीच्या लग्नातील आहेर (रोख रक्कम) हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत तेथील दिनदुबळ्या, गरीब, रोग्यांची सेवा करणाऱ्या प्रकाश आमटे यांना द्यावा असा विचार त्यांनी प्रथम आपली पत्नी व दोन मुली समोर व्यक्त केला. आणि त्या तिघीनीही कुठलेही आढेवेढे न घेता ह्या कल्पनेला तात्काळ मान्यता दिली. मुलीच्या लग्नपत्रिकेत तसे आवाहन त्यांनी केल्या नंतर समाज बांधव आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ह्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत लग्नादरम्यान कुठलीही वस्तू न देता रोख रक्कमेचा वर्षाव केल्याने अहेरापोटी ५ लाख रुपये जमा झाल्याचे आक्रे ह्यांनी सांगितले.