भाजप नेत्यावर टीका करताना राऊतांची जीभ घसरली, महीलेबद्दल आक्षेपार्ह विधान

mirgane and raut

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धडका राज्यभरात पहायला मिळत आहे. उमेदवारांकडून एकमेकांवर जोरदार टीका सुरु आहे. यामध्ये आरोपप्रत्यारोप करत असताना नेत्यांची भाषा घसरत आहे. कन्नडचे हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खाल्याचा पातळीवर टीका केली आहे. तर दुसरीकडे बार्शी मतदारसंघात भाजप नेत्यावर टीका करताना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांची जीभ घसरली आहे.

एका सभेत बोलताना राजेंद्र राऊत यांनी भाजप नेते आणि महाहौसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्यावर अश्लील भाषेत टीका केली. मिरगणे यांच्यासह त्यांच्या पत्नी विषयी देखील राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.

बार्शी विधनासभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल विरुद्ध अपक्ष राजेंद्र राऊत यांच्यामध्ये लढत होत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निरंजन भूमकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजेंद्र मिरगणे यांनी आपली ताकद सोपल यांच्या माघे उभी केली आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर व मिरगणे हे मतदारसंघात सोपल यांचा प्रचार करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी बोलताना सभेत बोलताना राजेंद्र मिरगणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर अपक्ष उमेदवाराकडून केला जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्याच पाठीशी असल्याचं म्हंटल होत.