खड्डे, खंडणी व दहशतमुक्त बार्शीसाठी दिलीप सोपलांना विधानसभेत पाठविण्याची गरज : मिरगणे

बार्शी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बार्शी विधानसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना महायुतीची उमेदवारी दिलेले माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या माध्यमातूनच आगामी काळात बार्शी खड्डे, खंडणी व दहशतमुक्त होणार आहे असे मत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केले. निवडणुकीच्या प्रचार कार्यातील अंतिम टप्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी मिरगणे म्हणाले दिलीप सोपल यांचे नेतृत्वच बार्शी तालुक्यात विकासक्रांती घडविणार आहे. सोपलांच्याच माध्यमातून बार्शी तालुका उपसा सिंचन योजना मार्गी लागणार आहे. सोपल यांनी बार्शी तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती दिली. तीन सहकारी औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून कारखानदारी फुलवली. उद्योजक निर्माण केले. आता एम.आय.डी.सी. निर्माण करण्याचे काम सोपलच प्राधान्य क्रमाने करणार आहेत.

सोपलांच्या राजकीय परिपक्वतेमुळे तालुक्याच्या चौफेर विकासाची नव्याने सुरूवात होणार आहे. आजपर्यंत बार्शी शहराला उजनीचे पाणी भगीरथ प्रयत्न करून सोपलांनीच मिळवुन दिले. व तालुक्यात हरीतक्रांती घडवुन आणण्यासाठी त्यांनी साठवण तलावांची निर्मिती लघु व मध्यम प्रकल्पांची उभारणी व बंधारे बांधण्याचे काम केले. सोपलांच्या कामामुळेच आजपर्यंत ते सहावेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडूण आले आहेत. महायुतीची उमेदवारी मिळाल्यामुळे भविष्यात सोपल यांना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मोठा विकासनिधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात अतिवृष्टीमुळे वाहून जाणारे 167 टि.एम.सी. पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 12 टि.एम.सी.पाणी बार्शी तालुक्याकडे वळविण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे बार्शी तालुका सुजलाम् सुफलाम् होणार आहे.

यावेळी सोपलांचे विरोधक माजी आमदार राऊत यांच्यावर टिका करताना मिरगणे म्हणाले तालुक्याचे नेतृत्व करण्याची राऊत यांची शैक्षणिक पात्रता व वैचारीक पातळी नाही. राऊत यांच्याकडे विकासाची कसलीही दृष्टी नाही. त्यांनी कायम स्वत:च्या कुटूंबियांचे आर्थिक हित सांभाळले आहे. राजकारण हा राऊतांचा धंदाच आहे. त्यांना उद्योगातले काही कळत नाही म्हणूनच स्वत:चा दुध उद्योग दुसर्याला विकावा लागला. त्यांच्याकडे नागरिकांनी विश्वासाने सत्ता सोपवली. पण नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना भ्रष्टाचाराशिवाय काही करता आले नाही.

राऊत यांनी शिवसेना प्रमुखांचा तर विश्वासघात केलाच पण त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याही विश्वासाला तडा दिला. नगरपालिकेला शहरी भुयारी गटारी योजनेच्या माध्यमातून मोठा विकास निधी मुख्यमंत्र्यामुळे मिळाला. पण बार्शीत या योजनेची कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झाली. रस्त्यांची खड्डे खांदल्यामुळे दुरावस्था झाली. शहरात नागरिकांना दुचाकीवरून आणि पायी चालणेसुध्दा अवघड झाले आहे. अनेक नागरिकांना पाठीचे, मनक्याचे, मानेचे आजार या रस्त्यांमुळे जडले. शहरातील नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा त्रास झाल्यामुळे अस्थमा, खोकला व श्वसनाचे विकार झाले. शहरात मुबलक पाणी उपलब्ध असून सुध्दा नागरिकांना दहा दहा दिवस पाणी मिळाले नाही. व महिलंाना अतोनात त्रास सहन करावा लागला.

आजही पाणी वेळेवर आणि नियमित येत नाही. नागरिकांना गुंठेवारी करण्यासाठी लाच द्यावी लागते. व्यापारी संकुलाचे भाडे आवास्तव आहे. यामुळे गरजू तरूण हे गाळे घेवु शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. नगरपालिकेतील सत्तेमुळे नागरिकांना जर अशा भयानक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर अशा तथाकथित नेतृत्वाला राजकारणातून हद्दपार करण्याची गरज आहे. नुकतेच राऊत यांनी महिलेचा अपमान करणारे विधान केले. यावरूनच त्यांची पातळी लक्षात येते. राऊतांच्या ताब्यातील प्रत्येक सत्ताकेंद्र हे कंत्राटदारांकडून कमिशन उकळण्याचे साधन बनले आहे.

बाजार समितीच्या सत्तेच्या माध्यमातून व्यापार्यांना व्यापारी परवाने व गाळे हस्तांतरण करताना लाखो रूपये द्यावे लागले हि वस्तुस्थिती आहे. सतत गाळे काढून घेण्याच्या धमकी मिळत असल्यामुळे व्यापारी धासतावले आहेत. बार्शी बाजार पेठेची आवक कमी झाली आहे. यापुर्वीही राऊत यांनी अपघाताने व चुकून आणि योगायोगाने मिळालेल्या पदाचा गैरवापर करून ब्रॉडगेस रेल्वे स्टेशन शहराबाहेर नेले. त्यामुळे आज शहरातून दररोज पुणे मुंबईकडे जाणार्या नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी 200 रूपये रिक्क्षा भाडे देवुन स्टेशवर जावे लागते. हा कायमस्वरूपी त्रास बार्शीकरांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्याबरोबर शहरानजीक रेल्वे स्टेशन होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

महत्वाच्या बातम्या