पंकजा मुंडे यांच्यावर टीका करण्याची मेटेंची लायकीसुध्दा नाही – राजेंद्र म्हस्के यांचा प्रहार

टीम महाराष्ट्र देशा : स्वत:ला स्वंयघोषित राष्ट्रीय नेते समजणाऱ्या आ.विनायक मेटे यांच्याकडे एकही लोक प्रतिनिधी आणि पदाधिकारी राहिलेला नाही. यामुळेच ते राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावर बेछूट आणि पातळी सोडून आरोप करत आहेत. पंकजा मुंडे यांच्यावर टीका करण्याची मेटेंची लायकीसुध्दा नाही.अशा शब्दात भाजपचे युवा नेते राजेंद्र म्हस्के यांनी विनायक मेटेंवर प्रहार केला आहे.

विनायक मेटे यांनी जिल्हा प्रशासनामध्ये विनाकारण लुडबूड केली. एवढेच नव्हे तर अत्यंत खालच्या पातळीवर जावून पंकजाताईवर अनेकवेळा टिकाही केली. भाजपाबरोबर महायुतीसोबत असल्याने शिवसंग्रामला नेहमीच राज्य सरकारकडून सन्मान देण्याचा प्रयत्न झाला. त्या बळावरच मेटे गटाचे जि.प.सदस्य निवडून आले.

पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आ.मेटे यांच्या एकाधिकारशाहीला वैतागून भाजपामध्ये सामील झाल्याचे शल्य मेटेंना चांगलेच बोचले आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे ते वागू लागले आहेत, पंकजाताईंवर टीका कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल. राष्ट्रवादीला पाठींबा देताना केलेल्या भाषणामध्ये त्यांनी जी शिवराळ भाषा वापरली त्यावरुन त्यांच्यातील गुणवत्ता आणि त्यांच्या विचाराची पातळी जनतेच्या लक्षात आली आहे.

वास्तविक पाहता पंकजा मुंडेंवर टीका  करण्याची त्यांची लायकीही नाही. भविष्यात त्यांनी त्यांचे राजकारण करताना आमच्या भगिनी पंकजाताई मुंडेंवर टीका केली तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे.