राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी  गावित यांना भाजपकडून तिकीट मिळणार असल्याची चर्चा होती. दरम्यान आज काँग्रेस नेते राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत गावित हेच भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे.

भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती दरम्यान चिंतामण वनगा यांच्या मुलाने श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेकडून पालघर मतदार संघातून जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने, भाजप या ठिकाणी कोणता उमेदवार देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, आता राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, गावित हेच भाजपचे उमेदवार असल्याचं निश्चित झाले आहे.

गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राजेंद्र गावित यांच्या नावाची शिफारस भाजपच्या संसदीय मंडळाला पाठवली आहे, त्यावर रात्रीपर्यंत निर्णय येईल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

दुसरीकडे शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजीचे वातावरण असून, शिवसेनेने असं करायला नको होतं. त्या जागेवर भाजपने विजय मिळवला होता. अशा शब्दात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.