जोस बटलरच्या शतकी खेळीनंतर राजस्थानचा हैदराबादवर ‘रॉयल’ विजय

दिल्ली : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा ५५ धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ केवळ १६५ धावापर्यंत मजल मारु शकला. धडाकेबाज शतकासाठी राजस्थाचा सलामीवीर जोस बटलरला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादचा नवा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम फलंदाजीसाठी राजस्थानच्या संघाला पाचारण केले. तिसऱ्याच षटकात राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल १२ धावांवर माघारी तंबुत परतला. यानंतर कर्णधार संजु सॅमसन(४८) आणि सलामीवीर जोस बटलर (१२४) यांनी १५० धावांची भागीदारी केली. दोघानी हैदराबादच्या संघाच्या गोलंदाजाचा खरपुस समाचार घेतला. सतराव्या षटकात सॅमसन बाद झाल्यानंतर बटलरने बॅटचा तडाखा चालुच ठेवला आणि या हंगामातील तिसरे शतक झळकावले. बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने निर्धारित २० षटकात २२० धावांचा डोंगर उभारला. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने ६४ चेंडुत ११ चौकार आणि ८ षटकारासंह सर्वाधिक १२४ धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात हैदराबादचा नियमीत सलामीवीर वॉर्नरच्या अनुपस्थितीत डावाची सुरुवात करायला जॉनी बेअरस्टो(३०) सोबत मनीष पांडे(३१) आला. या दोघांनी संघाला अर्धशतकी सलामी देत चांगली सुरुवात करुन दिली. मात्र दोन्ही सलामीवीर बाद होताच हैदराबादचा संघ बॅकफुटवर गेला. हैदराबादच्या संघातील इतर कोणत्याही खेळाडूला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. कर्णधार विल्यमसन(२०) , केदार जाधव(१९) आणि मोहम्मद नबी(१७) हे मोठी खेळी करण्यात अपयशी झाल्याने निर्धारित २० षटकात हैदराबादचा संघ १६५ धावापर्यंत मजल मारु शकला. हैदराबादकडून सलामीवीर मनीष पांडेने २० चेंडुत ३ चौकार आणि २ षटकारासह सर्वाधीक ३१ धावा केल्या. तर मुस्तफिझूर रहमान आणि ख्रिस मॉरीस दोघांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या