धक्कादायक घटना : राजस्थानमध्ये रामकथा वाचना वेळी पावसामुळे मंडप पडून १४ जणांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : राजस्थान मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रामकथा वाचनाच्या कार्यक्रमात अचानक वादळी पावसामुळे मंडप पडल्याने १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

 

या दुर्घटनेनंतर मंडपाखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे कार्य सुरू आहे. तर या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुख: व्यक्त केले असून जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बालोतरा येथे एका वस्तीवर रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. रामकथा ऐकण्यासाठी महिला आणि पुरुष भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळच्या सुमाराच आलेले वादळी वारे आणि पावसापुढे हा मंडप तग धरू शकला नाही आणि भाविकांवर कोसळला. या दुर्घटनेत १४ भाविकांचा जागीच मृत्यू, तर २४ गंभीर जखमी झाले. कथा सुरू असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते