म. गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींवर साधला निशाणा

मुंबई : महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आजच्या व्यंगचित्रात गांधीजींच्या वेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चरखा चालवताना दिसत आहेत. कापडापासून सूत बनविणारे महात्मा मोदी असं उपहासात्मक व्यंगचित्र रेखाटले आहे.

राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाध्यक्ष अमित शहांना लक्ष्य केलं आहे. आपल्या व्यंगचित्रातून महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी व्यक्त होताना, राज यांनी मोदींना आधुनिक गांधी बनवले आहे. त्यामध्ये, मोदी चरखा चालवत असून ते कपडापासून सूत तयार करत आहेत. विशेष म्हणजे भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावरील कपडे काढून हे सूत बनविण्यात येत असल्याचे व्यंगचित्रात दिसत आहे. तर देशाची अर्थव्यवस्था आणि विचारवादाचा उडालेला गोंधळ कचऱ्याच्या ढिगासारखा गुंडाळल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून सूचवले आहे. राज यांच्या या चित्रात भिंतीवर अडकवलेल्या छायाचित्रातून महात्मा गांधी आश्चर्यपणे मोदींकडे पाहात असल्याचे दिसून येते.