‘पूरग्रस्तांना मदत करताना जाहिरातबाजी करणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार’

टीम महाराष्ट्र देशा– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र, ‘पूरग्रस्त भागातली स्थिती पूर्वपदावर येण्यास बराच अवधी लागू शकतो, त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असलेल्या या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलाव्यात’, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांसाठी वाटपाच्या धान्याच्या पाकिटांवर मुख्यमंत्री आणि आमदाराचा फोटो छापल्याबद्दल, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्यात आली. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, सत्ताधारी पक्ष या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची जाहिरात करत असल्याचं, विरोधकांनी म्हटलं आहे.

कधी आणि कुठे जाहिरात करावी, याचं भान असलं पाहिजे, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं, तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, सरकार पूरग्रस्तांना मदत देण्यापेक्षा स्वत:च्या जाहिरातीला प्राधान्य देत असल्याचं म्हटलं.मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका करणारी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जाहिरातबाजीमुळे चांगलीच तोंडघशी पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील आपण मदत करत असल्याची जाहिरातबाजी केली असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

या पाकिटांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांचं छायाचित्र आहे. ही पाकिटं सरकारकडून आलेली मोफत मदतीची पाकिटं आहेत, हे स्पष्ट व्हावं, यासाठी पाकिटांवर स्टीकर्स चिकटवलेली असल्याचं सांगत, हळवणकर यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले.