दानशूर अक्षय कुमारवर टीका करणारे राज ठाकरे हे मुद्दे लक्षात घेणार का?

akshay kumar and raj thakrey

टीम महाराष्ट्र देशा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अक्षयवर निशाणा साधला होता. अक्षय कुमारच्या पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमावरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं. हे सिनेमे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. सोशल मिडीयावर सध्या राज यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात असून अक्षय कुमारने देशातील शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी , जवानांसाठी केलेल्या मदतीची यादीच फॉरवर्ड केली जात आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपवर टीकेची झोड उठवली होती . राजकारणासह, सामाजिक, शैक्षणिक आणि बॉलिवूडवरही भाष्य केलं.याच भाषणात राज ठाकरे यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमावरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं. हे सिनेमे सरकार पुरस्कृत आहेत, हे काम करायला अक्षय कुमार आहे. असं राज ठाकरे म्हणाले.याचवेळी राज ठाकरे यांनी अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन निशाणा साधला. भारत, भारत करणारा अक्षय कुमार स्वतःच भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंचा हा दावा खरा आहे. अक्षय कुमारला कॅनडाचे मानद नागरिकत्व दिलं आहे . भारत सरकार दोन नागरिकत्वाची परवानगी देत नाही. त्यामुळे अक्षयने भारताचं नागरिकत्व सोडलं असलं तरीही अक्षय कुमार शेतकऱ्यांसाठी सैन्यातील जवान किंवा शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कायमच तत्पर राहिला आहे. लष्कराच्या कल्याणासाठी 1 टक्के सेस आकारावा, अशी मागणी करणारा अक्षय कुमार हा सध्या एकमेव कलाकार आहे याची आठवण करून देणे याठिकाणी आवशयक आहे.

दिलदार अक्षयने केलेली मदत
नवी दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये त्यानं शहिदांच्या कुटुंबीयांना 13 कोटींची मदत केली. अक्षय ‘भारत के वीर’ हे देशभक्तीपर गीत लॉन्च करण्यासाठी गेला होता तेव्हा त्याने शहीद जवानांच्या परिजनांसाठी तब्बल 12.93 कोटी रूपयांची मदत केली. तसेच आसाममध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवान नरपत सिंह हे शहीद झाले. त्यानंतर अक्षयनं त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना 9 लाखांची मदत केली.

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी अक्षय कुमारच्या संकल्पनेतून नवं अॅप तयार करण्यात आलं आहे. ‘भारत के वीर’ असं या वेब पोर्टलचं नाव असून या पोर्टलच्या माध्यमातून इच्छूकांना शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येणार आहे. या पोर्टलसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबियांना ही मदत पोहचवण्यात येत आहे.

छत्तीसगडच्या सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या 12 जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने 1 कोटी 8 लाख रुपये मदत केली आहे.या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते.

मुंबईतील नायगाव येथे त्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.पोलिस आणि त्यांच्या कुटुंबांना उपचाराच्या काळात राहण्यासाठी चांगली सुविधा मिळेल. पोलिस देशासाठी मोठं योगदान देतात. आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा हाच खरा मार्ग असल्याचं अक्षयचं मत आहे.

यवतमाळमधील पिंपरी बुटी गाव दत्तक घेत त्याने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अक्षय कुमारनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. ज्या गावांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, ते गाव अक्षय दत्तक घेण्याची इच्छाही त्यानं व्यक्त केली होती. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक आत्महत्या झालेलं गाव सुचवण्यास सांगितलं होतं.

अक्षयकुमारने चेन्नई पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला . पूरग्रस्तांसाठी अक्षयकुमारने एक कोटी रुपयांची मदत दिली आहे.एका ट्रस्टतर्फे चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. ट्रस्टचे प्रमुख, निर्माते जयेंद्र यांच्याकडे अक्षयने मदतीचा चेक सुपूर्द केला.

याशिवाय बीडमधल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजाराची मदत केली प्रत्येक महिन्याला 15 लाख याप्रमाणे 6 महिन्यात एकूण 90 लाखांची मदत केली .

अक्षयच्या कामाची यादी खूप मोठी आहे. महिला,कष्टकरी,शेतकरी, जवान, पोलीस यांच्या वेदना त्याने जाणून घेतल्या व सढळ हाताने मदत देखील केली. असंख्य कलाकार, गब्बर झालेले उद्योजक ,अतिश्रीमंत नेते, कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणारे क्रिकेटपटू असणाऱ्या या देशात अक्षयसारखा संवेदनशील व्यक्ती सापडणे दुर्लभच.तो भारताचा नागरिक आहे की नाही, त्याने किती कोटी रुपये दान दिले यापेक्षा त्याच्याकडे देण्याची दानत आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.