मनसे निवडणुकीच्या रिंगणात; विधानसभेच्या १०० जागा लढवणार?

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका या तोंडावर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षाची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने कोणतीही भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. आज मनसेची विधानसभा निवडणुकी संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीत मनसे १०० जागा लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तरीही राज ठाकरेंनी राज्यभरात भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. परंतु त्यांच्या प्रचाराचा फारसा फायदा आघाडीला झाला नाही त्यामुळे ते आता विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेत विधानसभा निवडणूकही न लढण्याचा सूर पाहायला मिळाल्याची माहिती समोर आली होती.

राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची शक्यता होती. परंतु त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीत घेतलेले नाही. त्यामुळे आता मनसे स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु मनसे नेमक्या कोणत्या जागा लढवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.