सीबीआय विरुद्ध पोलिसांच्या संघर्षात राज ठाकरेंचा ममतादीदींना पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरु केलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. “केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात ममता बॅनर्जी यांना जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो.”, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी पत्रक काढून ममता बॅनर्जी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ?

“राज्य सरकारला विश्वासात न घेता, सीबीआयने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावार छापेमारी केली. सीबीआयची स्वायत्तता संपुष्टात यावी यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जे प्रकार केले ते देशाने पाहिले आहे. पण नरेंद्र मोदींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करु नये. आपला देश संघराज्य आहे आणि राज्याच्या अधिकारांवर घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही, हे भाजप सरकारने विसरु नये. केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात ममता बॅनर्जी यांना जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो.” – मनसे अध्यक्ष राज ठाकरे.