राहुल गांधींना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली पाहिजे – राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : काल गुढीपाडव्यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्या प्रकारे नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्याची संधी दिली गेली त्याचप्रकारे राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची संधीही मिळाली पाहिजे. कदाचित हे देशासाठी चांगले असेल. इतकेच नाही तर, मोदी हे दुसरे एडोल्फ हिटलर आहेत असाही गंभीर आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सभेला संबोधित करताना म्हटले की, पंतप्रधान होण्यापूर्वी  मोदींना माहित नव्हते की त्यांना आई आहे, पण जसे ते पंतप्रधान बनले तसे ते मीडियातील लोकांना घेऊन आपल्या आईला भेटायला गेले.  निवडणूक जिंकण्यासाठी बीजेपी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, जर ते पैसे देत असतील तर खुशाल घ्या कारण त्यांनी आपल्या सर्वाना लुटलेले आहे. परंतु त्यांना बिलकुल मत देऊ नका आणि त्यांना सत्तेतून बाहेर फेकून द्या असे आवाहन देखील त्यांनी केले.