fbpx

राज ठाकरेंची सोलापुरात सभा, आंबेडकर – स्वामींच्या कोंडीत सापडलेल्या कॉंग्रेसला आशेचा किरण

raj thakrey and sushilkumar shinde

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता राज्यभरात दहा सभा घेण्याची घोषणा केली आहे. यामध्ये १५ एप्रिल रोजी एक सभा सोलापूर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. प्रकाश आंबेडकर आणि भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीने कोंडी झालेल्या कॉंग्रेसला राज यांच्या सभेने आशेचा किरण मिळण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत थेट आघाडीला पाठींबा न देता भाजपला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे, स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचार करत आहे. सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फायदा भाजप उमेदवाराला होवू शकतो. दरम्यान, राज यांनी सोलापूरमध्ये सभा घेण्याचे जाहीर केल्याने कॉंग्रेसला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे भाजप विरोधात सभा घेणार असले तरी मंचावर आघाडीच्या नेत्यांना स्थान नसणार आहे. या सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे, राज यांच्या तोफेसाठी दारुगोळा पुरवण्याच्या कामाला मनसेसह आघाडीचे नेते लागले आहेत.

मोदींनी २०१४ मध्ये सोलापुरात दिलेली आश्वासने, प्रत्यक्षात झालेले काम, भाजपचे उमेदवार, त्यांचे बोगस जातवैधता प्रमाणपत्र, भाजपच्या दोन मंत्र्यांचे काम आदी माहिती मनसेच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.