राज ठाकरेंच्या हाताला दुखापत; फ्रॅक्चर लावून पक्षाच्या बैठकांमध्ये झाले सामील

raj thakrey

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम रसिक म्हणून ओळखले जातात. मग ते कला क्षेत्र असो व क्रीडा ! त्यांचे हे रसिक मन अनेकदा समोर आलं आहे. दरम्यान, टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. हाताला फ्रॅक्चर लावूनच ते आज पक्षाच्या महत्वाच्या बैठकांमध्ये सामील झालेले पाहायला मिळालं.

शिवाजी पार्क येथे राज ठाकरे टेनिस खेळण्यासाठी जात असतात. मात्र, टेनिस खेळताना त्यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांनी हाताला प्लास्टर केलं आहे. कोरोना काळानंतर राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचं धुमशान सुरु झालं आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणूक अवघ्या काही दिवसांनवर आल्या आहेत. तर, औरंगाबाद, कोल्हापूर सारख्या शहरांच्या महापालिकांच्या निवडणूक देखील आता जवळ आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीला संबोधित करण्यासाठी आज सकाळी राज ठाकरे वांद्र्यात पोहोचले. यावेळी त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचं समजताच चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या हाताच्या हेअरलाईनला फ्रॅक्चर झालं असून काळजी करण्याचं कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हाताला सपोर्टर लावलं आहे.

दरम्यान, येत्या ग्रामपंचायत निवडणुकांसह आगामी काळातील निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तर, मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी हाताला काही लागलंय का असा काळजीपूर्वक सवाल केला असता, ‘तुला काय वाटलं मी असंच बांधलंय का?’ असं उत्तर त्यांनी दिलं.

महत्वाच्या  बातम्या