गद्दारांची दोन दिवसात पक्षातून हकालपट्टी करणार,राज ठाकरेंनी दिले मोठ्या कारवाईचे संकेत

औरंगाबाद : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा चांगलाच चर्चेत आहे. आता हा दौरा पूर्ण झाला असून आज ते मुंबईकडे रवाना होणार आहे. दरम्यान, मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी आता धडाकेबाज भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले. मनसे पक्षातील काही पदाधिकारीच वाईट बातम्या पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा गद्दारांची दोन दिवसात पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मनसे पक्षाबाबत काही पदाधिकारी जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवत आहे. तसेच अशा पदाधिकारांची नावं देखील माझ्याकडे आली असून अशा गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे.

दरम्यान, काल राज ठाकरे औरंगाबाद दौरा अर्धवट सोडणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. यानंतर जेष्ठ नेते बाळा नांदगावकर याना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. काही माध्यमांनी चुकीच्या आणि अपूर्ण माहितीच्या आधारे चुकीच्या बातम्या दिल्या आहे. राज ठाकरेंच्या सोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकी नियोजित होत्या त्या झालेल्या आहेत. असा खुलासा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुक वर व्हीडीओद्वारे केला आहे.

माध्यमांत ज्या बैठकांबद्दल बोललं जात आहे , तशा कुठल्याही बैठका ठरल्या नव्हत्या. यासंदर्भात आलेल्या बातम्या खोट्या आहेत. अश्या खोट्या बातम्या देत जाऊ नका. तसेच अधिकृत व्यक्तीकडून माहिती घेऊनच बातमी द्यावी अशी विनंती करतो असेही नांदगावकर म्हणाले होते.