महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातून होणार आणखीन एका ठाकरेंची एन्ट्री

amit & raj thackeray

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा विधानसभा आणि राज्यभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मनसेला सर्वच ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील काहीशी मरगळ आल्याचं दिसत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर राज्यातील दौऱ्यांचे नियोजन केले आहे, 9 जुलैपासून ते मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांचे पुत्र अमित ठाकरे राजकीय पदार्पण करणार असल्याचं बोलल जात आहे.

मनसेचा कणा असणारा युवा वर्ग पक्षापासून दुरावत असल्याने गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे यांना पक्षामध्ये ‘अॅक्टीव्ह’ करण्याची चर्चा सुरु होती. सध्या अमित ठाकरे हे विविध शाखांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. राज ठाकरे हे 19 जुलै ते 25 जुलैपर्यंत हा मराठवाडा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात राज यांच्यासोबत अमित ठाकरेही असणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यातूनच अमित राजकारणात प्रवेश करणार असल्याच म्हंटल जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर दुसऱ्या पिढीतील उद्धव – राज ठाकरे यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला आहे, उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी देखील युवासेनेच्या माध्यमातून राज्यभरात आपल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. त्यानंतर आता अमित ठाकरे यांचा राजकीय प्रवेश मनसेसाठी कितपत फायदेशीर ठरणार हे पहावं लागणार आहे.