अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि नोटाबंदीवरुन राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. दादर येथील शिवाजी मंदिर येथे ‘शोध मराठी मनाचा’ या १४ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या सांगता सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बांधणं ही शुद्ध फसवणूक असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई अहमदाबादला बुलेट ट्रेनची गरज काय आहे, काय ढोकळा खायला जायचंय का, हे कशासाठी केलं जातंय. मुंबई यांना मिळाली नाही, हे अजूनही यांच्या डोक्यातून जात नाहीय का? मुंबई ते दिल्ली सर्वाधिक विमान प्रवास होत असताना केवळ अहमदाबादलाच बुलेट ट्रेन का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात अश्वारुढ पुतळा उभारण्याचा प्लॅन म्हणजे खिशात पैसे नसताना घेतलेला निर्णय आहे. शिवाजी महाराजांबद्दल इतकाच आदर असेल तर त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

८ नोव्हेंबर रोजी ज्या आत्मविश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला तो आत्मविश्वास ३१ डिसेंबर रोजी झालेल्या भाषणात दिसला नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींची बॉडी लॅंग्वेज चुकलेली स्पष्ट दिसते.

जागतिक मराठी अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (ट्रस्ट) तर्फे दादर येथील शिवाजी मंदिर येथे दोन दिवसीय मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या संमेलनात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. दरम्यान, या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं व्यंगचित्र देखील काढलं.