भाजपने राजकारण केल्यानेच भुजबळांना सुटायला उशीर – राज ठाकरे

भाजपालाही एक्सपायरी डेट आहे हे त्यांनी लक्षात ठेवावंं

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात बदल करण्यात आल्याने न्यायालयाने भुजबळांना जामीन देण्यास परवानगी दिली होती. मात्र, न्यायालयाने सांगितल्यानंतरही भाजपने राजकारण केल्याने भुजबळांना सुटायला उशीर झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कोर्टाने सांगूनही सरकार चालढकल करत हे चुकीच आहे, आता स्वत:च्या फायद्यासाठी भाजपने भुजबळांना बाहेर काढल असेल तर हे राजकारण चुकीच असल्याचही राज ठाकरे म्हणाले. भाजपालाही एक्सपायरी डेट आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असा टोलाही राज यांनी लगावला.

दोन वर्षानंतर भुजबळांची सुटका
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भुजबळ यांनी २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर केला . त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता ७१ वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती

का झाली होती अटक ?
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.

You might also like
Comments
Loading...