पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे उद्या पुण्यात

raj-thackeray

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बरखास्त केली होती. त्यानंतर ते स्वतः पुणे शहरात येऊन महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार ते उद्या पुण्यात येत असून उद्याच्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीत पुणे शहर कार्यकारणी जाहीर होणार आहे.पुणे महापालिकेच्या निवडणुकांत मनसेची वाताहत झाली. 2012 च्या निवडणुकीत मनसेने 27 जागा जिंकून नाशिक नंतर मोठे यश पुण्यात मिळवले होते.

मात्र पुणेकरांच्या प्रश्नांवर नेहमीच तटस्थ भूमिका घेतल्याने मनसेला पुणेकरांचा विश्वास टिकवता आला नाही. त्यामुळे 2017 च्या निवडणुकात पक्षाला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले.त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाताहत झाल्यानंतर तळापासून पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: काही महिन्यापूर्वी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. पक्षाची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये वाढविण्यासाठी काम करणाऱ्यांना संधी देऊन पदे देण्याचा शब्द ठाकरे यांनी दिला होता.

त्यानुसार मनसेच्या नेत्यांनी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील विविध स्तरावरील पदाधिकारी नियुक्त्यांची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर पूर्ण करण्यास सांगितले होते. शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली असून विभागस्तरावरील प्रक्रिया ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.