कार्यकर्त्यांची मरगळ दूर करण्यासाठी राज ठाकरे पुणे दौ-यावर

raj-thackeray

पुणे  : गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मनसेला मिळालेल्या अपयशामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षांची नव्याने बांधणी करण्याचे काम हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे ३० आणि ३१ जानेवारी रोजी पुणे दौ-यावर येत आहेत. राज यांच्या उपस्थितीत पुणे शहर पदाधिकांऱ्याची निवड केली जाणार आहे.

गेल्या २०१४ च्या लोकसभा तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१२ च्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये २८ नगरसेवक निवडून आलेल्या मनसेचे २०१७ च्या निवडणुकीत फक्त दोन नगरसेवक निवडून आले. तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी आणि नंतर अनेकांनी पक्षांतर केले. त्यानंतरची कार्यकर्त्यांना आलेली मरगळ दूर करण्यासाठी पक्ष पातळीवरून हवे तसे प्रयत्न झाले नाहीत.

केंद्र आणि राज्य सरकारबद्दल सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा फायदा घेण्यासाठी राज ठाकरे सरसावले असून त्यांनी राज्यातील पदाधिकारी बदलण्याचे सत्र सुरू केले आहे. पुणे शहरातील विभाग स्तरावरील पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ३० आणि ३१ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत मनसे नेते शिरीष सावंत, संदीप देशपांडे, प्रमोद पाटील उपस्थित असणार आहेत.Loading…
Loading...