परप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ ? उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं

टीम महाराष्ट्र देशा : परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अनेकदा उत्तर भारतीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे स्टाईल राड्याचा फटका आतापर्यंत अनेकदा उत्तर भारतीयांना बसला आहे. मात्र आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे परप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उत्तर भारतीयांवर कायम टीका करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण राज ठाकरेंना देण्यात आलं होतं. हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे. 2 डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात राज ठाकरे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमातून राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधतील. उत्तर भारतीय महापंचायतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.