आज मनसेचं महाअधिवेशन; राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

raj thackaray at shivtarth sabha

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईत होत आहे. गोरेगाच येथील नेस्को सेंटर येथे आज सकाळी नऊ वाजल्यापासून मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात होणार आहे. स्वत: राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर, उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यानंतर नवीन झेंड्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

तसेच राज ठाकरे हिंदुत्वाची वाट स्वीकारणार का आणि मनसेच्या झेंड्यात शिवमुद्रेचा वापर केला जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवसभर याठिकाणी उपस्थित राहणार असून संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.एकीकडे पक्षाचा झेंडा आता भगवामय झाला असून मनसे कडवट हिंदुत्वाकडे वळणार अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राज ठाकरे अधिवेशनात कोणती भूमिका मांडणार, पक्षाचा नवा झेंडा आणि अजेंडा काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मनसेच्या महाअधिवेशनसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.