‘मी ग्रॅज्युएट नाही, मला आजपर्यंत कुणी डिग्रीबद्दल विचारलंही नाही’

टीम महाराष्ट्र देशा : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्वतःच्या पदवीबद्दल एका जाहीर कार्यक्रमात खुलासा केला. “शिक्षणासाठी पदवी लागते. कलेला पदवी लागत नाही. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी नाही,’ असे राज ठाकरे म्हणाले.

झील इन्स्टिट्यूट पुणे आणि कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘इंक अलाइव्ह’ व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उदघाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मी याठिकाणी फार फार तर दीड मिनिटं बोलण्यासाठी आलो आहे. आज याठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे पालक असायला पाहिजे होते. मी केवळ आणि केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्यामुळे मी पुण्यात आलो आहे. माझं दुसरं कोणतंही काम नाही,’ असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ‘राज्य सरकार जेव्हा चित्रकला हा विषय पर्यायी विषय म्हणून ठेवते, तेव्हा अशा संस्था उभ्या राहायला हव्या. यामुळे विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी कला असते. ती चित्रकलाच असली पाहिजे असं नाही. ती कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे. शिक्षणाला डिग्री लागते. पण कलेला कोणत्याही प्रकाराची डिग्री लागत नाही.