राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार सांग काम्या- राज ठाकरे

मुंबई: राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार हे सांग काम्या आहे. केंद्रातून जे सांगितलं जाईल, तेव्हढंच हे करतात. तोंडातून ब्र काढायची यांची हिंमत नाही. अशी कणखर टीका राज ठाकरे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलतांना राज्यसरकारवर केली आहे.

नाणार प्रकल्पावरून राज ठाकरे यांनी राज्यसरकारवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्री म्हणतात जर नाणार प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल. पण गुजरातच का, अन्य राज्ये नाहीत का?असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान नाहीत, तर ते गुजरातचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जमीन बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी होणे गरजेचं आहे.

परप्रांतियांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. मात्र प्रकल्प येण्याआधी ज्या परप्रांतियांनी जमिनी घेतल्या आहेत, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. गुजरातमधले लोक महाराष्ट्रात ज्या ठिकाणी प्रकल्प होणार आहे, त्या ठिकाणी जमिनी कशा घेतात? त्यांना महाराष्ट्र सरकारनेच त्याबाबत माहिती दिली आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला.