मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. यानंतर आज राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुंबईतील लिलावती रूग्णालयात राज ठाकरेंवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
मे महिन्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. तसेच ते मुंबईला परतले होते. याआधी राज ठाकरे यांची हि शस्त्रक्रिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. पण अखेर आज सकाळी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली आहे.
पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पाय दुखण्याच्या त्रासामुळे त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार होती. आज राज ठाकरेंवर लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.
दरम्यान, राज यांची शस्त्रक्रिया होण्याआधी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना केली. तर काल ही शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भीमाशंकरमध्ये सुद्धा अभिषेक करण्यात आला. तसेच मनसैनिकांनी सुप्रसिद्ध शारदा गणपतीला महाआरती करून ५५० नारळाचे तोरण अर्पण केले होते.
महत्वाच्या बातम्या
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<