मनसे राजापूर रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी – राज ठाकरे

रत्नागिरी: कोणत्याही प्रकल्पाला कोकणवासियांकडून सुरूवातीला प्रखर विरोध होतो. मात्र, पॅकेज जाहीर झाल्यानंतर हा विरोध मावळतो. कोकणी माणूस मॅनेज होतो असा शासनाचा दृष्टिकोन झाला आहे. तो बदलण्यासाठी सातत्याने कडवट विरोध करा. कोणत्याही शासनाचे कोकणात प्रकल्प आणण्याचे धाडस होणार नाही. मी आणि माझा पक्ष तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहे, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांना आपला पाठिंबा जाहीर केला. राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त असलेला चौदा गावातील लोकांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे आज तालुका दौ-यावर आले होते. यावेळी सागवे येथे झालेल्या बैठकीत ठाकरे बोलत होते.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून लोकांचा विरोध असल्याने नाणारचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, अभिजित पानसे, राजा चौघुले, शिरीष सावंत, मनोज सावंत, नंदू चव्हाण आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. पर्यटनदृष्ट्या प्रगतीशील असलेल्या केरळ, गोवा आदी राज्यांमध्ये पर्यावरणाला पूरक प्रकल्प उभारले जातात. असे असताना पर्यावरणदृष्ट्या सुजलाम-सुफलाम कोकणच्या माथी असे विनाशकारी प्रकल्प का मारले जातात, असा सवाल ठाकरे यांनी केला. विकासाला आपला विरोध नाही. मात्र स्थानिक जनतेचा विरोध असताना शासनाकडून प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आपला विरोध राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली एकजूट कायम राहिल्यास शासनाला हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडू, असेही ते म्हणाले. जगाच्या पाठीवर झालेली युद्धे किंवा महायुद्धे जमिनींवरून झाल्याच इतिहास आहे. त्यामुळे आपल्या बहुमूल्य जमिनी विकू नका अन्यथा अन्य मंडळी तुमच्या जमिनी कमी दराने खरेदी करतील आणि चढ्या दराने विकून स्वतः श्रीमंत होतील. या सा-या प्रवासामध्ये आपण आपल्या जमिनीवरून हद्दपार व्हाल, याची सा-यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तत्पूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने नंदकुमार कुलकर्णी, मच्छीमार नेते मजीद भाटकर, स्वाती कुलकर्णी आणि तन्वी मोंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्याला जोरदार बळ देऊन हा विनाशकारी प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. मेळाव्याला मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.