Rainy season and Ayurveda : आला पावसाळा तब्येत सांभाळा !

टीम महाराष्ट्र देशा : पावसाळ्यात शरीर आणि पचनशक्ती या दोहोंची ताकद कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात अन्न पचायला हलके, उष्ण आणि कमी प्रमाणात घ्यावे. आले, लसूण, पुदिना, काळी मिरी यांचा स्वयंपाकात वापर करावा. पाणी गाळून आणि उकळून प्यावे. शक्यतो पायी चालणे टाळावे. तळलेले, मसालेदार, चमचमीत पदार्थ टाळावेत. कुळीथ सूप किंवा पिठलं स्वरुपात वापरावेत. सर्दीतापाचे प्रमाण या ऋतूत वाढते. अशा वेळी कडकडीत लंघन करावे. चांगली व खरी भूक लागल्यावर मुगाचे आले, मिरे घातलेले गरम सूप प्यावे. विश्रांती घ्यावी. अजीर्ण होऊन जुलाब होत असल्यासही असाच उपाय करावा.

या ऋतूत वाताचा प्रकोप असतो म्हणून, वात वाढवणारे पदार्थ जसे बटाटा, मटार, हरभरा, गवार, इत्यादी टाळावेत. बस्ती हा वातदोषासाठीचा मुख्य उपक्रम आहे कारण पक्वाशय किंवा मोठे आतडे हे वाताचे मुख्य स्थान आहे, आणि बस्ती थेट तेथेच कार्य करतो. आधुनिक वैद्यकानुसार सुद्धा, आतड्यात न्युरोन चे मोठ्या प्रमाणात जाले आहे. त्यामुळे विशेषतः वाताचे त्रास असणाऱ्यांना बस्ती खूप उपयोगी पडतो. अर्थात निरोगी लोकांनी सुद्धा वाताचे आजार होऊ नयेत म्हणून तो करावाच. अर्थात वाताचे त्रास होणाऱ्यानी अवश्य करावाच. त्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

आरोग्य मंत्रा : वाताची लक्षणे आणि काळजी

यामध्ये तेलाचे बस्ती आणि काढ्याचे बस्ती असे दोन प्रकार आहेत. तेलाच्या बस्तिलाच स्नेहबस्ती किंवा अनुवासन बस्ती म्हणतात. शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करण्यासाठी सुरुवातीला २-३ स्नेह बस्ती देऊन मग काढ्याचे बस्ती दिले जातात. यासाठी बला तेल, निर्गुंडी तेल, धान्वंतर तेल अशा विविध तेलांचा गरजेनुसार वापर केला जातो. काढ्यांच्या बस्तीलाच निरुह किंवा आस्थापन बस्ती अशी संज्ञा आहे. हा खऱ्या अर्थाने अधिक वाढलेल्या वाताला शरीराबाहेर काढतो. यामध्ये अनेक वनस्पतींचे काढे, तेल, मध, सैंधव, इत्यादिकांचे एकजीव मिश्रण कोमट तापमान असताना वापरले जाते. स्नेह बस्ती जेवण झाल्यावर देतात, तर निरूह बस्ती रिकाम्या पोटी देतात. संधिवात, मलावरोध, आमवात, पाठदुखी, कंबरदुखी Multiple Sclerosis, लकवा अशा अनेक वातरोगांवर बस्तीचा खूप चांगला फायदा होतो. मात्र हा उपचार तज्ञ वैद्याकडेच करणे आवश्यक आहे. आमच्या सदाशिव पेठ आणि कर्वेनगर अशा दोन्ही दवाखान्यात बस्तीची सोय उपलब्ध आहे.
– डॉ. दिलीप गाडगीळ(वैद्य)