जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती फक्त एका क्लिकवर

मुंबई : आषाढ संपत असताना संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी पूर आला आहे. धरणांंमधील साठ्यात समाधानकारक वाढ होत असून खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरण ८० टक्के भरलं आहे. धरणातून साडे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे जायकवाडी धरणातल्या पाणी पातळीत तीन टक्क्यानं वाढ झाली आहे, मात्र धरणाचा पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं येळगाव धरण १०० टक्के भरलं आहे. पैनगंगा नदीलाही पूर आला आहे, या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. जिल्ह्यातल्या लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा मेहकर, चिखली आणि मोताळा या तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे.

या आठवड्यात राज्यात सर्वदूर दमदार पाऊस होईल, अशी आनंदवार्ता हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.मराठवाड्यात काल बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागात काल हलका पाऊस झाला.

‘या’ कारणामुळे नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता

मुख्यमंत्री फडणवीसांच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय