सत्ता स्थिर तर पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणी

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी करण्यात आली आहे. घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी यंदाच्या पीक-पाण्याची भविष्यवाणी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज या घटमांडणीनंतर व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे. त्यामुळे सत्ता स्थिर राहू शकेल असे संकेत आहेत.

काय आहे भेंडवळची घटमांडणी?

भेंडवळ इथं होणाऱ्या या घटमांडणी वर शेतकर्यांचा विशेष विश्वास आहे. येत्या हंगामात पीकपरिस्थिती, पाऊस, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज, देशावरील संकटे, शत्रूंच्या कारवाया, राजाची गादी टिकणार काय, अशा सर्व प्रश्नांबाबत इथं अंदाज व्यक्त करण्यात येतात. हे ऐकण्यासाठी हजारो शेतकरी भेंडवळला जमतात.

भेंडवळच्या घटमांडणीला सुमारे तीनशे वर्षांपेक्षाही जुनी परंपरा असून चंद्रभान महाराज वाघ यांनी घटमांडणीची सुरुवात केली. आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढय़ाच विश्वासाने जपली जात आहे. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्यांचे लक्ष लागून असते.