‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?

नवी दिल्ली : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा १,२५१ वर पोहोचला आहे, तर ३२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.

जनजीवन पुन्हा पूर्वपदावर कधी येईल याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला करोनाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला १५ एप्रिलपासून सुरुवात होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजस्थान पत्रिकाने यासंबंधी वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाईटवर १५ एप्रिलपासून प्रवासाची तिकिटं उपलब्ध असणार आहेत. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे.