रेल्वेच्या डब्यांना आयसोलेशन कक्ष तयार करण्याच्या कामाला वेग

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना पूरक बनविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या डब्यांचे आयसोलेशन कक्षात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये दैनंदिन 375 डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कक्षात केले जात असून, सुमारे 2500 डब्यांना आतापर्यंत रूपांतरित करण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर रेल्वेच्या डब्यांमध्ये जुन्या आयसीएफ डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कक्षात करण्यात येणार आहे. यापैकी 50 टक्के म्हणजे 2500 डब्यांचे आयसोलेशन कक्षांत रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाला गती मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून एका दिवसाला 375 आयसोलेशन कक्ष तयार केले जात आहेत.

त्याचप्रमाणे, एका गाडीच्या 20 डब्याचे स्वरूप बदलले जात आहे. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर रुग्णालयाच्या खाटांची व्यवस्था करून प्रवासी डब्यांचे विलगीकरण करून आयसोलेशन कक्ष तयार केले जात आहेत. प्रत्येक कोचमध्ये 10 ते 16 कोरोनाग्रस्त रुग्णांना यातून उपचार मिळणार आहेत. प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन टॉयलेटचे रूपांतर बाथरूममध्ये करण्यात आले आहे, तर टॉयलेटमध्ये बादली, मग आणि साबण प्लेट ठेवली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 892 डब्यांचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार देण्यासाठी 482 आयसोलेशन वॉर्ड तयार केले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये आयसोलेशन डबे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. परळ वर्कशॉप एलटीटी आणि वाडीबंदर येथील कोच केअरिंग सेंटरमध्येदेखील आयसोलेशन डबे तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 410 डब्यांचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये होणार आहे. हे काम लोअर परळ, गुजरातमधील वर्कशॉपमध्ये सुरू आहे