‘ड्रंक अँड ड्रार्इव्ह’प्रकरणी रायगड पोलिसांनी वसूल केला २५ लाखांचा दंड

नऊ महिन्यात १ हजार ६९१ चालकांवर कारवाई

अलिबाग : मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर (ड्रंक अँड ड्रार्इव्ह) कारवाई करण्याच्या रायगड जिल्हा पोलिसांच्या मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलीस शाखेमार्फत जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत २५ लाख ३२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या प्रकरणी या नऊ महिन्यात १ हजार ६९१ चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही रायगड वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक मनोज म्हात्रे यांनी दिली.

मद्यप्राशन करुन वाहन चालविणा-यां विरोधात रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेमार्फत जानेवारी महिन्यात मोहिम हाती घेण्यात आली होती. जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक अण्ड ड्राईव्ह’ प्रकरणी केलेल्या कारवाईत जानेवारी ते जुलै या ६ महिन्यांच्या कालावधीत १८ लाख ६९ हजार ५०० रुपये, ऑगस्ट महिन्यात २ लाख ७० हजार ५०० रुपये तर सप्टेंबरमध्ये ३ लाख ९२ हजार ५०० रुपये असा एकूण २५ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. या प्रकरणातीळ आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय त्यांना दंड भरल्यावर सोडून देते. सध्या या गुन्ह्यासाठी असलेला दंड हा वाढवणे आवश्यक आहे. या दंडात वाढ केल्याने शासनाला तर त्याचा नक्कीच फायदा होर्इल. पण मद्यपींनादेखील कारवार्इची भीती बसेल, असे म्हात्रे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...