fbpx

ईडीचा धडका सुरूचं, रत्नाकर गुट्टे यांच्या घरावर आणि कारखान्यांवर छापे

टीम महाराष्ट्र देशा : देशात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ‘ईडी’ ( अमलबजावणी संचनालय) चा धडका सुरू आहे. आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या परभणी, नागपूर आणि मुंबईतील घर आणि प्रतिष्ठानांवर ईडीने गुरुवारी छापे मारले आहेत. यावेळी ईडीने रत्नाकर गुट्टे यांच्या घरामध्ये असणारी गैरव्यवहारा संबंधीत कागदपत्रं जप्त केली.

औरंगाबाद उच्च न्यायालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत गुट्टे यांची मालमत्ता अद्याप का जप्त करण्यात आली नाही? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला. त्यानंतर ईडीकडून ताबडतोब कारवाई करण्यात आली. या कारवाई वेळी ईडीच्या 25 अधिकाऱ्यांनी गुप्तपणे गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्स लिमिटेड या कारखान्यावर धाड टाकली. तसेच परळी येथील घर, मुंबई आणि नागपूर येथील कार्यालयांसह अशा 9 ठिकाणी छापे मारून अनेक महत्वाची कागदपत्र आणि दस्तावेज जप्त केले.

२०१७ मध्ये मध्ये परभणीच्या गंगाखेड शुगर्स अँन्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने 29 हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर 6 बँकाकडून तब्बल 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. या गैरव्यवहार प्रकरणी रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. त्यामुळे गुट्टे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु औरंगाबाद न्यायालयाने देखील गुट्टे यांचा जामीन अर्ज फेटाळला. उलट न्यायालयाने तपासणी पथकाला चांगलेच सुनावले. न्यायालयाने गुट्टेंच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित केला.