मोदींच्या लग्नसोहळ्यावर धाड, लोकप्रतिनिधींकडून नियमांचे उल्लंघन

कोरोना

बीड : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासन आणि सर्व यंत्रणा सतर्क आहे. मास्क-सॅनिटायझरचा वापर, गर्दी जमवण्यावर बंदी इत्यादी नियमांचे पालन कडकपणे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत. मात्र, लोकप्रतिनिधींकडूनच हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे समोर येत आहे. अंबाजोगाईत नगरसेविकेच्या कुटुंबाने सर्व नियमांना केराची टोपली दाखवत धूमधडाक्यात एका हॉटेलात गर्दी जमवून मुलाचा थाटामाटात विवाह साजरा केला. मात्र, याची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी हॉटेल मालक, वरपिता, डॉल्बीवाला अशा ४ जणांवर शहर पोलिसांत साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मोठी काळजी घेतली जात आहे. यात विशेषत: लग्न सोहळ्यांमध्ये शेकडोंनी लोक एकत्र येत असल्याबाबत तक्रारी असून कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या मंगल कार्यालयांवर, हॉटेलांवर छापे मारून कारवाई करा अशा सूचना दिल्या होत्या. दरम्यान, अंबाजोगाईत शनिवारी (२० फेब्रुवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तथागत चौक या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलच्या मोकळ्या मैदानात धूमधडाक्यात लग्न सोहळा सुरू असताना अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या पथकाने छापा मारला. नगरसेविकेच्या कुटुंबातील हा विवाह सोहळा होता.

पोलिसांनी छापा मारला तेव्हा परवानगीपेक्षा अधिक लोक उपस्थित होते, मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर या नियमावलीचा पूर्णत: बोजवारा उडालेला होता. यामुळे हॉटेल मालक कोपले व ज्यांच्या घरचे लग्न होते ते अशोक श्यामलाल मोदी व प्रदीप श्यामलाल मोदी, डॉल्बी मालक ऋषिकेश चापेकानडे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या