राहुल गांधींच्या जम्मू – काश्मीर दौऱ्याला खोडा, श्रीनगर विमानतळावरचं विरोधकांना रोखले

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ देखील आहे. मात्र राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना विमानतळावरुनचं परत पाठवण्यात येणार असल्याचं दिसत आहे. जम्मू काश्मीरचे कलम 370 हटवल्या नंतर राहुल गांधी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असून तिथल्या नागरिकांचीही भेट घेणार आहेत.

जम्मू काश्मीरसाठीचं कलम 370 हटवल्यानंतर विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर आहे. याआधीच जम्मू काश्मीर प्रशासनाने राहुल गांधींसह इतर नेत्यांना राज्याचा दौरा न करण्याचं आवाहन केलं होतं. या नेत्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नेत्यांनी इथे येणं टाळावं. आतापर्यंत कोणत्याही नेत्याला राज्यात प्रवेश करु दिलेला नाही, असं जम्मू काश्मीर प्रशासनाने म्हटलं होतं.

दरम्यान कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीकेचं लक्ष्य केलेलं असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असं आवाहन केलं होतं त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असं त्यांनी म्हटलं होतं.