माझ्या वडिलांनी देशासाठी प्राण दिले, हे सत्य बदलणार नाही – राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज सुरु होण्यापूर्वी किंवा आल्यानंतर त्यातील अनेक गोष्टी चर्चेचा आणि वादाचा विषय ठरतात. मग पुढेच बरेच दिवस त्यावर प्रतिक्रिया येतात. सध्या सोशल मीडिया आणि देशाच्या राजकीय पटलावर एका वेब सिरीजच्या चलती आहे, ती म्हणजे सेक्रेड गेम्स.

या वेबसिरीजमध्ये दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच यातील काही दृश्य हटवण्याची मागणीदेखील करण्यात येत आहे, याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सवरील या सीरिजमध्ये आणीबाणी, बोफोर्स घोटाळा आणि शाह बानो या सर्व प्रकरणांवर प्रकाशझोत टाकण्यात आल्यामुळेच हा विरोध होत आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजविषयी प्रतिक्रिया देत एक ट्विट केलं आहे. ‘माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे भाजपा आणि आरएसएसला वाटते. माझे वडिल या देशासाठी जगले, देशासाठी त्यांनी मरण पत्करलं, हे सत्य ‘सेक्रेड गेम्स’ या कल्पक वेब सीरिजमधल्या पात्रांमुळे बदलणार नसल्याच ट्विटमध्ये सांगण्यात आल आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी दाखवलेल्या भूमिकेमुळे ‘सेक्रेड गेम्स’चा सहदिग्दर्शक असणाऱ्या अनुराग कश्यप यांनी त्यांच्या या भूमिकेला प्रशंसनीय ठरवलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करनेही त्यांची प्रशंसा केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित करत राजकारणात सक्रिय असणाऱ्या राहुल गांधी यांची ही भूमिका प्रशंसनीय आहे, असं म्हणत स्वराने एक ट्विट केलं. ज्या ठिकाणी गोष्टींना दाद देणं गरजेचं आहे, तिथे ती दिलीच गेली पाहिजे हेसुद्धा तिने या ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं.

मोदींकडून राहुल गांधींवर करण्यात येणारी टीका म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’चा प्रकार

वंदे मातरम एका ओळीत संपवायला सांगितले, राहुल गांधींकडून ‘वंदे मातरम’चा अपमान