fbpx

नोटबंदीमुळे झालेले नुकसान न्याय योजना भरून काढणार : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही देशातील न्याय (न्यूनतम आय योजना) योजनेअंतर्गत गरीब जनतेला प्रत्येकी ७२ हजार रुपये देऊ अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आणखी एक दावा केला आहे. अर्थव्यवस्थेला चालना आणि २० टक्के गरीब जनतेला अर्थसहाय्य असे दुहेरी लक्ष्य साध्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या नुकसानीला देखील ही योजना भरून काढणार आहे. आज ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, देशातील गरीब लोकांच्या हितासाठी न्याय योजनेची घोषणा केली आहे. आणि या योजनेच्या घोषणेमुळे भाजप आता भयभीत झाले आहे. तसेच नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या सरकारने पाच वर्षे निष्ठेने काम केले असते तर आतापर्यंत देशातली गरिबी संपली असती. असा टोला देखील गांधीनी यावेळी लगावला. पुढे राहुल गांधी म्हणाले की, न्याय योजना ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बनवली गेली आहे. त्यामुळे आम्ही नोटाबंदी किंवा जीएसटीसारखा उतावीळपणा केलेला नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आमचे सरकार आल्यास आम्ही प्रत्येक गरीबाच्या खात्यावर ७२००० रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम कुटुंबातील महिलेच्या खात्यात जमा होणार असून या योजनेचा लाभ देशातील २५ कोटी गरिबांना होणार आहे. असे ते म्हणाले होते.