माझी विचारांची लढाई सुरूच राहणार असून, इथून पुढे अधिक तीव्रतेने लढणार : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामाजिक कार्यकर्ते गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध आहे, असे ट्विट केले होते. राहुल गांधीच्या या विधानावरून मुंबईतील शिवडी कोर्टामध्ये राहुल गांधींच्या विरोधात याचिका दाखल केली होती. तर शिवडी न्यायालयाने आज राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. यावेळी राहुल गांधींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

माझी विचारांची लढाई सुरूच राहणार असून, गेल्या ५ वर्षांच लढलो त्यापेक्षा अधिक तीव्रतेने लढणार असल्याच ते म्हणाले. तसेच कोर्टात हजर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. या प्रकरणी आपण दोषी नसल्याचे त्यांनी कोर्टापुढे मांडले. तर राहुल यांनी राजीनामा देऊ नये असे राज्यातील नेत्यांनीही शिवडी कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत मांडले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा कॉंग्रेसच्या कार्यकारणीने फेटाळला होता. मात्र राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम होते. काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नसल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.