राहुल गांधीनी घेतली लालू प्रसादांची भेट; राजकीय चर्चेला उधान

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिल्ली एम्समध्ये जाऊन लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे. चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. २०१९ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

चारा घोटाळ्याच्या अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव सध्या एम्समध्ये उपचार घेत आहेत. याआधी ते रांचीमधील तुरुंगात होते. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रांचीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांना एम्समध्ये हलवण्यात आले.

चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी सात वर्षे याप्रमाणे एकूण १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी डिसेंबर १९९५ ते डिसेंबर १९९६ या काळात दुमका येथील कोषागारातून अवैधरीत्या ३ कोटी ७६ लाख रुपये काढल्याचा आरोप आहे. दुमका आता झारखंडमध्ये आहे. या प्रकरणाची सुनावणी ५ मार्च रोजी पूर्ण झाली होती. त्यांना १९ मार्च रोजी दोषी ठरवण्यात आले. मार्चला यावर निर्णय झाला व त्यांना दोषी ठरवले.